Tuesday, September 18, 2018

गण्या, मास्तर आणि चित्रकला

मास्तर वर्गात येतात.

वर्गावर एक नजर. गण्याकडे बघून थोडं दचकतात. गण्या मान खाली घालून काहीतरी रेघाटत बसलाय.

मास्तर थोडं खाकरून विद्यार्थ्यांना विचारतात," तुम्ही एवढेच? बाकीचे कुठायत?"
गण्या त्याच पोझिशनमध्ये म्हणजे डोकं वर न करता , "तुमच्या गणिताच्या तासाऐवजी आज पी टी तास घ्या म्हणून मुलांनी मुख्याध्यापकांना गळ घातली आणि ते तिकडे ग्राउंडवर गेलेत."
मास्तर : मग तुम्ही का थांबलाय?
गण्या (अजूनही तसाच) ,"कारण आम्हाला चित्र काढायची आहेत."
मास्तर : कसली?
गण्यानं वर मान केली. कपाळावरचे केस वर नेले आणि
 म्हणाला, " काहीतरी भन्नाट"
मास्तर बुचकळ्यात पडले. म्हणाले, " भन्नाट म्हणजे?"
गण्या जरा तोऱ्यात म्हणाला ,"भन्नाट म्हणजे भन्नाट. काहीतरी वेगळं, अफलातून. जगात नाव झालं पाहिजे."
मास्तर (जरा प्रेमळ आवाजात), "बाळा, हे तुझ्या डोक्यात कुणी भरवलं?"
गण्या नाक फुगवत आणखी तोऱ्यात म्हणाला , "कुणी कशाला भरवायला पाहिजे? आमचं डोकं लै भारी आहे."
मास्तर थोड्या मिश्किल आवाजात, " काय सांगतोस?"
गण्या उभा राहिला आणि कमरेवरील अदृश्य तलवारीवर हात ठेवत आणि आता ती अदृश्य तलवार म्यानातून बाहेर काढणार आहे अश्या पोझ घेऊन थोडं मान वर करत, नाक फुगवत म्हणाला, "मास्तर, तुम्ही अजून आम्हाला ओळखलं नाहीत? आमचं म्हाभ्रत पुस्तक वाचलात ना?"
मास्तरांनी गण्याचा कानपकडला आणि रागानं म्हणाले," परत त्या पुस्तकाचं नाव काढू नको. म्हणे भन्नाट!"
गण्याचा आवेश क्षणात गायब. गण्या थोडं कळवळून," ओ मास्तर, असं काय करता? काहीतरी भन्नाट चित्र काढायला द्या ना!"
मास्तर : ठीक आहे. ते कोरे पेपर सर्वांना एक एक वाट.
गण्याने सर्वांना पेपर वाटले पण स्वतःसाठी दोन घेतले.
मास्तर : गण्या, एक एक घ्यायला सांगितला.
गण्या : मास्तर, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आलीये.
मास्तर ( थोडा त्रासिक चेहरा करून, कपाळावर आठ्या पाडत) : परत? अजून एक?
गण्या : अहो तश्या खूप आयडिया आहेत माझ्याकडे.
मास्तर : परत नाटकासारखी आयडिया काढलीस तर तुला शाळेभोवती दहा राऊंड मारायला लावीन.
गण्या (जरा घाबरून) : अरे बापरे! राहू दे! माझ्या आयडियाना कुणी वालीच नाही.
गण्या खाली बसतो. दोन्ही पेपर समोर आहेत. मान वर आणि डोळे छताला चिकटलेले.
मास्तर : चला, फुलाचं चित्र काढा. (गण्याकडे तिरक्या नजरेने बघत) बघू कोण भन्नाट चित्र काढतंय ते.
सगळी मुलं चित्र काढायला सुरू करतात.
गण्या अजून विचार करतोय.
मास्तर (जरा मिश्कील आवाजात) : गण्या, कसला विचार करतोयस? धोताऱ्याच फुल छताला चिकटलय काय?
गण्या नाक फुगवून मास्तरांकडे बघतो आणि चित्र काढायलासुरू करतो.
मास्तर मुलांच्या चित्रांवर नजर मारत फिरत असतात. गण्याजवळ येतात आणि विचारतात ," हे कसलं चित्र?"
गण्या (तोंड फुगवून) : हवेचं!
मास्तर (गोंधळून) : हवेचं? अरे मी फुलाचं चित्र काढायला सांगितलं ना? मग?
गण्या गप्पच. रेघोट्या मारणं सुरूच ठेवतो आणि म्हणतो ," त्यासाठी खूप पुरवण्या लागणार आहेत."
मास्तर : काय? पुरवण्या? ते कशाला?
गण्या : फुलाचं भन्नाट चित्र काढायला.
मास्तर : अरे ही काय परीक्षाआहे का?
गण्या : काय हो मास्तर? एक तर भन्नाट चित्र काढा म्हणता आणि परत पेपर देत नाही. कसं काढणार आम्ही?
मास्तर (माघार घेत) : बरं बरं! बाकीचं फुल पण काढायचंय हे विसरू नकोस. (मास्तरांनी अजून दोन कोरी पानं गण्याला दिली)
 गण्याने त्या पानांवर एक दोन रेघोट्या मारल्या आणि ओरडला ," मास्तर पुरवणी पाहिजे."
 मास्तरांसहित सगळीच मुलं त्याचाकडे बघायला लागली.
 मास्तर गण्याच्या टेबलाकडे दोन पानं घेऊन आले आणि म्हणाले, "बघू काय काढलंयस?"
 गण्या : आत्ताच दाखवू शकत नाही
 मास्तर : का?
 गण्या : बाकीचे कॉपी करतील.
 मास्तर जोरात हसायला लागले. त्यांना काय बोलावं कळालं नाही म्हणून ती दोन कोरी पानं त्याच्यासमोर ठेवली आणि हसत बाजुला गेले.
 परत दोन मिनिटात गण्या ओरडला ," मास्तर पुरवणी"
 आता मास्तर दचकलेच. त्यांना कळेना काय करतोय काय गण्या.
 मुलं पण चुळबूळ करायला लागली.
 मास्तरांनी अजून दोन पानं गण्याच्या समोर ठेवली.
 गण्या : काय चेंगटपणे देताय दोन दोन पानं. द्या की जरा जास्ती."
 मास्तरांना चेंगट म्हटल्याचा राग आला. त्यांनी कोऱ्या पेपरचा गठ्ठा उचलला आणि गण्याच्या समोर आपटला. आणि खुर्चीत जाऊन गण्यावर लक्ष ठेऊन गप्प बसले. गण्या एक दोन रेघा मारून पेपर बाजूला ठेवत होता. मास्तर ते बघून चुळबुळ करायला लागले. त्यांना कळेना. मनात विचार करत थोडं चिडत होते. मनात विचार सुरू झाले, 'खूप दिवसात हा आपल्या हातात सापडला नाही. बघतोच याचं भन्नाट चित्र कसलं आहे ते! नाहीतर बडवतच त्याच्या घरी नेतो.'
मास्तरांचा थोडा डोळा लागणार एवढ्यात गण्या ओरडला,"वा:! झालं तयार फुलाचं भन्नाट चित्र"
मास्तर दचकले. गण्याजवळ आले आणि पानं बघितली. त्यावर वेड्यावाकड्या रेघोट्या मारलेल्या. एकाही पानावर फुलाचं चित्र काही दिसायला तयार नाही.
मास्तरांनी गण्याचा कान पकडला आणि ओरडले ,"हे तुझ्या फुलाचं भन्नाट चित्र?"
गण्या (कळवळत), "अहो, मास्तर ऐका तरी!"
मास्तर (गण्याचा कान थोडा पिरगळत), "काय ऐकायचं? प्रत्येक पान न पान खराब केलास. एकावर पण फुलाचं चित्र नाही. "
मास्तर रागानं थरथरत होते.
गण्या (जोरात कळवळत), "मास्तर, अहो ऐका तरी! ही पानं घेऊन आपण शाळेच्या व्हरांड्यात जाऊ. तुम्हाला फुलाचं चित्र दाखवतो.
मास्तर अजून भडकलेलेच. : चल. उचल सगळी पानं. तुला आज बघूनच घेतो.
गण्यानं पानं उचलली आणि व्हरांड्याकडे चालला. मागे मास्तर पाय आपटत रागानं चाललेले. जाताना छडी घ्यायला विसरत नाहीत. त्यांच्या मागे बाकीची मुलं. जरा टिंगल करायच्या मूड मध्ये.
गण्या आणि मास्तर व्हरांड्यात पोचतात.
मास्तर (छडी उगारत) : हा. दाखव आता.
गण्यानं थोडे खडे घेतले.
मास्तर (थोडं घाबरत) : अरे खडे कशाला? मारायचं बिरायचं नाही हा. नाहीतर फोडून काढीन तुला.
गण्या घाबरत मास्तरांकडे बघतो आणि घाबरत एक एक पान खाली पसरायला लागतो. प्रत्येक पानावर एक खडा ठेवतो.
मास्तर पूर्ण गोंधळलेले. हाताची घडी घालून उभे. गण्या काय करतोय कळेना.
गण्याचं काम सुरूच. एक पान काढायचं. ते नीट बघायचं आणि ठेवायचं. पानं जुळवून ठेवताना घाबरून मास्तरांकडे तिरक्या नजरेनं लक्ष ठेऊनच काम चालू.
सगळी पानं झाली. एकवेळ नजर मारून मास्तरांसमोर आला आणि खाली मान घालून म्हणाला, "ते बघा, फुलाचं भन्नाट चित्र."
मास्तरांना काही कळेना. गण्याकडे बघत मास्तर : हे तुझं चित्र? काहीच दिसत नाही किंवा कळत नाही. आज तुझं काही खरं नाही.
मास्तरांनी परत गण्याचा कान पकडला.
गण्या कळवळत : अहो जरा थांबा. आपण शाळेच्या छतावर जाऊ. तिथून बघा.
सगळे शाळेच्या छतावर गेले.
खालचं दृश्य बघून मास्तर थक्क झाले. एक मोठ्ठं फुल त्यांना दिसत होतं. ते आवासून ते चित्र बघत होते. डोळ्यात थोडं पाणी तरळलं.
गण्याला त्यांनी जवळ ओढलं. गण्या घाबरला.
मास्तर (अगदी गदगदून)  : वा:! पोरा वा:! अप्रतिम चित्र रेखाटलस. मी कल्पना सुद्धा केली नव्हती की असं सुद्धा काही करता येऊ शकत. सुंदर. मला तुझा खरंच अभिमान वाटतोय की तू माझा शिष्य आहेस ते.
गण्या (आश्चयाने) : मास्तर, तुम्हाला खरंच आवडलं?
मास्तर : हो रे पोरा. फारच छान. तुझी बुद्धिमत्ता फार उत्कृष्ट आहे.
(आणि मास्तरांनी गण्याची पाठ थोपटली)
गण्याची छाती मस्त फुगली.
गण्या (लगेच थोड्या तोऱ्यात) : मास्तर, तरी तुम्हाला आम्ही म्हणत होतो, की अजून आम्हाला तुम्ही ओळखलच नाही. अजून बऱ्याच आयडिया आहेत आमच्या डोक्यात.
मास्तर : हो का? थांब जरा तुझ्या आयडिया जरा बाहेर काढतो थांब.
गण्या : अहो पण का? आता तर माझं कौतुक करत होतात ना?
मास्तर (छडी सावरत) : एक फुल तू वेगवेगळ्या पानावर थोडं थोडं काढलंस म्हणून तुझं कौतुक. पण एक फुल काढायला १०० पानं ? अजून तुझ्या आयडिया साठी काय काय करायला लावशील सांगता येत नाही. अभ्यास कमी आणि आयडिया जास्त झालेत.
असं म्हणत मास्तर गण्याकडे सरावले. गण्याला कळालं आता काय होणार ते. लगेच त्याने वर्गाकडे धाव घेतली...

Sunday, October 18, 2015

गण्या आणि मास्तर - भाग ४ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

मास्तर कसलं तरी पुस्तक हातात घेऊन वर्गात येतात, वाचतच.
त्यावर लिहिलेलं असतं " म्हाभ्रत". अगदी मन लावून वाचत असतात. गण्याकडे लक्ष अजिबात नाही आणि चालता चालता पाठमोऱ्या गण्याला येऊन धडकतात. गण्या खाली पडतो.

गण्या ( जोरात ओरडत ) : आय आय आय! ( गडाबडा लोळायला लागतो) मास्तर पडलो की मी.

मास्तर : अरे बापरे! गण्या असा कसा काय पडलास?

गण्या : अहो मास्तर तुम्ही धडकलात की आत्ता मला!

मास्तर (अगदी मवाळ आवाजात) : कोण मी? छे रे! तुला सांगितलं ना की मला पिक्चर सारखे स्टंट किंवा धडकाधडकी आवडत नाही ते!

गण्या ( डोकं खाजवत ) : मग कोण धडकल?

मास्तर : मला काय माहीत! हे बघ मी आत्ताच आलोय. ( आणि परत पुस्तक वाचायला सुरु करतात).

गण्या ( जोरात उडी मारून किंचाळतो ) : आई शप्पत! मास्तर तुम्ही चक्क मराठी पुस्तक वाचताय?

मास्तर ( कसा बसा चेहरा करून ) : त्यात काय झालं? मी नेहमीच वाचतो.

गण्या (मास्तरांचं स्पष्टीकरण न पटल्यामुळे ) : छ्या! काय पण! तुम्हाला सातवीचं गणिताचं पुस्तक सोडून काहीच आवडत नाही. मला माहिती आहे ना!

मास्तर ( कमरेवर दोन्ही हात ठेवून ) : तूला कसं काय माहिती?

गण्या : अहो गेली चार वर्ष तुमच्या हातात तेच तर पुस्तक बघत आलोय मी!

मास्तर : गण्या! एकतर आज पर्यंत सातवीत तीन वेळा नापास झालास. मग मी तुला आता पहिलीचं गणिताच्या पुस्तकातून शिकवायचं काय?

गण्या : मी खूप आधीच पास झालो असतो हो! पण तुम्ही आम्हाला कधी कोप्याच करू दिल्या नाहीत. म्हणून दर वर्षी गणितात नापास होतो मी.

मास्तर : अरे गधड्या, ते हॉलीवुड बॉलीवुड चे सिनेमे बघण्यापेक्षा जरा गणिताचे पाढे नीट पाठ केले असतेस ना तर आता पर्यंत तुझं लग्न झालं असतं आणि तुझी पोरं सातवीत असती!

गण्या (तोंड फुगवुन ): मास्तर, सारखं मला सिनेमा बघण्यावरून बोलायचं नाही काय!

मास्तर : मग काय तुझी आरती ओवाळू? ( मास्तर पुस्तकाची आरती करून गण्याला खरोखर ओवाळतात).

गण्या (तोंड फुगवुन) : मास्तर, असं परत चिडवलात तर मी नाटकात भाग घेणार नाही बघा!

मास्तर (गडबडून जातात): अरे गण्याsss! अरे बाळा! असं लगेच चिडायचं नाही!

गण्या (अजून तोंड फुगवुन गालातल्या गालात): तुम्ही मला सारखं चिडवता!

मास्तर : बरं बाबा! नाही चिडवणार आता!

गण्या (खुशीत येऊन): ठीक आहे! पण तुम्ही काय वाचताय एवढं मन लावून?

मास्तर (जरा लाजत) : गण्या कुणाला सांगायचं नाही!

गण्या : बरं! नाही सांगत!

मास्तर : त्याचं काय आहे?

गण्या (मधेच) : काय आहे?

मास्तर : ऐकणार आहेस की नाहीस?

गण्या : अहो मग सांगा की! तुमचच तर ऐकतोय!

मास्तर : कुणाला सांगायचं नाही आणि हसायचं पण नाही! काय?

गण्या : आता सांगणार की मी जाऊ घरी?

मास्तर (गडबडीत ) : मी आपल्या नाटकासाठी इतिहासाचा अभ्यास करतोय!

गण्या एकदम जोरात हसायला लागतो. अगदी हसता हसता गडाबडा लोळायला लागतो. मास्तर कावरेबावरे होतात. इकडे तिकडे बघत गण्याला गप्प बसायचा इशारा करतात. पण गण्या हसायचा काही थांबत नाही.

मास्तर (खाली मान घालून ): गण्या sss! तुला आधीच म्हणालो होतो ना की हसायचं नाही म्हणून.

गण्या ( जोरात हसतच) : पण मास्तर, तुम्ही आणि इतिहास?

मास्तर : मला पण वाटलं की आपण नाटक करतोय तर त्याची माहिती घ्यावी आधी!

गण्या : बरं बरं! पण काय वाचताय?

मास्तर : अरे मी महाभारत शोधायला आपल्या लायब्ररीत गेलो पण ते काही सापडलं नाही. मग हे पुस्तक दिसलं! म्हटलं वाचून बघावं!

गण्या : बघू बघू! (गण्या मास्तरांच्या हातातलं पुस्तक घेतो आणि वरचं नाव जोरात वाचतो) : म्हाभ्रत! वा! मस्त पुस्तक आहे!

मास्तरांना जरा बरं वाटलं! आपण काही तरी भारी वाचतोय असं वाटून त्यांची मान थोडी ताठ झाली.

गण्या (पुस्तक अगदी डोळ्यासमोर उचलत मोठ्ठया आवाजात) : गणपत थापलावे!

मास्तर सुद्धा तेवढ्याच् मोठ्या आवाजात : गणपत थापलावे. मोठे लेखक आहेत वाटतं! यांचं नाव कुठेतरी वाचलयं बहुतेक!

गण्या : अहो, ते खूप मोठे लेखक आहेत. हे "म्हाभ्रत" पुस्तक त्यांचं पहिलच पुस्तक आहे. अजून खूप पुस्तके त्यांनी लिहिलेत.
आणि सगळी इतिहासावर!

मास्तर (डोळे मोठे करून हसत) : काय सांगतोस गण्या! खरचं?

गण्या : मग काय! तुम्हाला ओळखतात ते! आणि तुमची त्यांची नेहमी भेट पण होते.

मास्तर (अगदी आनंदून डोळे मोठे करत) : काय सांगतोस? मला ओळखतात? आणि मला कसं आठवत नाही त्यांना भेटल्याचं?

गण्या : काय हे मास्तर! एवढ्या मोठ्या माणसाला ओळखत नाही तुम्ही?

मास्तर (जरा कावरेबावरे होतात): त्याचं काय आहे गण्या! मला आज पर्यंत इतिहासात अजिबात आवड नव्हती. म्हणून कदाचित त्यांना विसरलो असेन!

गण्या : आज पर्यंत म्हणजे? आज कसं काय इतिहास आवडायला लागला?

मास्तर : हे पुस्तक खूप भारी आहे. वाचताना हातातून खाली ठेवावं वाटत नाही रे! त्या अर्जुन आणि रावणाची लढाई बद्दल कसलं लिहिले आहे! वाः। असं वाटतंय की हॉलीवुड मधलीच लढाई आहे की काय!

गण्या : अहो ते भारीच लिहितात! तुम्हाला आवडलं ना?

मास्तर : म्हणजे काय गण्या? आवडलं! खूप आवडलं! त्यांना पुन्हा एकदा भेटावं म्हणतोय!

गण्या : अहो मग भेटतील ना आत्ता!

मास्तर : आत्ता? आणि शाळेत? कशाला त्यांना त्रास देतोस?

गण्या : त्रास कसला मास्तर? त्यांना सुद्धा आवडेल.

मास्तर : मग ठीक आहे. बोलव त्यांना! कधी एकदा भेट घेईन असं झालयं मला! ( हे जरा दात ओठ खातच बोलतात)

गण्या : बोलवायला कशाला पाहिजे?

मास्तर : म्हणजे? (जरा गोंधळून)

गण्या (स्वतः कडे हात करत ताठ मान करून) : हेच ते महान लेखक.

मास्तर (दात ओठ खात, पुस्तकाची गुंडाळी करत): गण्या तू? थांब जरा तुझं इतिहास आता बाहेरच काढतो!

एवढं ऐकताच गण्या तिथून पळ काढतो. आणि मास्तर ते पुस्तक त्याच्या दिशेने फेकतात.

Tuesday, September 22, 2015

गण्या आणि मास्तर - भाग ३ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या: मास्तर, एक आईडिया आलीय डोक्यात माझ्या!

मास्टर (जोरात हसून): आईडिया? आणि तुझ्या डोक्यात? अरे आईडिया डोक्यात यायला, डोक्यात मेंदू लागतो! (परत हसायला चालू करतात)

गण्या: ओ मास्तर! ऐकणार आहे की नाही! (गण्या फुगुन तोंड फिरवतो)

मास्तर (लाडात येऊन): गण्याsss! ए गण्याsss! अरे असा चिडू नको रे बाळा! माझ्या लाडक्या!

गण्या (अजून फुगुन): आम्ही नाही जा! तुम्ही सारखं माझी टिंगल करत असता!

मास्तर : अरे असं चिडायचं नाही! बरं सांग बघू पटकन काय आईडिया आहे तुझ्या मेंदूत?

गण्या (खुशीत येऊन) (मास्तरांच्या समोर अगदी ऐटित चालत जातो)
( दोन्ही पाय पसरून कमरेवर हात ठेवुन उभा राहतो).

मास्तर जरा घाबरून पाठीमागे सरकतात.

गण्या ( पाय तसेच ठेवत एखाद्या नामांकित फिल्म डायरेक्टर सारखा हाताची फ्रेम करून, एका डोळा मिटुन दुसऱ्या डोळ्यांनी त्या फ्रेम मधून इकडे तिकडे बघत ): एक भन्नाट आईडिया आहे!

मास्तर (थोडं सावरत आणि मख्खपणे त्याच्या action कडे बघत): काय?

गण्या ( स्वतःची पोज़ तशीच ठेवत) : तुमची एंट्री एकदम थ्रिल्लिंग झाली पाहिजे!

मास्तर ( फुल कंफ्यूज ): माझी एंट्री? आणि थ्रिल्लिंग? म्हणजे?

गण्या (कपाळावर हात मारत ): अहो मास्तर, तुम्ही रावण होणार ना?

मास्तर : ए गण्या! हे मी कधीही बोललेलो नाही हां. आता अजून एक रोल माझ्या गळ्यात घालायचा नाही!

गण्या : अहो मास्तर! असं काय करताय?

मास्तर (अगदी कानावर हात ठेवत आणि मान थोडी वर करून डोळे बंद करत) : नाही! जमणार नाही!

गण्या : मग राहिलं तर! मी करतो रावणाचा रोल!

मास्तर ( पुन्हा गण्याकडे बघत ) : मग पुढे काय?

गण्या ( परत पोज़ घेऊन ) : आपण इथे स्टेजवर विमानतळ तयार करायचं!

मास्तर : विमानतळ? ते कशाला? आणि एवढ्याशा जागेत ते कसं मावणार?

गण्या : अहो मास्तर, तुम्ही परत विसरलात.

मास्तर : काय?

गण्या : रावनाकडे विमान होतं की नाही?

मास्तर : होतं की! मग?

गण्या : ते कुठे आणि कसं उतरणार?

मास्तर (फुल कंफ्यूज)(डोकं खाजवत) : रावनाचं विमान उतरायला विमानतळ?

गण्या : मग? रावनाला तुम्ही असा तसा समजला की काय? रावण फार श्रीमंत होता! तुम्हाला माहिती नाही?

मास्तर : मला कसं माहिती? मी गणिताचा शिक्षक आहे, इतिहासाचा नाही!

गण्या : परत परत मी तुम्हाला आठवण करून देतोय की तुमचं इतिहास कच्च आहे ते!

मास्तर : हो रे! गण्या परत चिडवायचं नाही काय? नाहीतर मी नाटकात येणार नाही बघ!

गण्या (लाडात येत ) : अहो मास्तर. माफ करा मला! मी लहान आहे ना अजून?

मास्तर (थोडं ताठ मानेने): ठीक आहे गण्या! तू लहान आहेस म्हणून सोडून देतो!

गण्या : मग ऐका ना माझी आईडिया!

मास्तर : हा सांग पुढे!

गण्या (परत पोज़ घेत) : रावनाचं विमान उतरायला इथं स्टेज वर विमानतळ बांधायचं!

मास्तर : अरे! पण!

गण्या (ओरडून ): थांबा हो जरा! ऐका तरी पूर्ण!

मास्तर ( जरा घाबरत ) : बरं बरं ! सांग!

गण्या ( पुन्हा पोज़ मधे ) : रावनाच्या विमानाचं जबरदस्त crash लँडिंग झालं पाहिजे!

मास्तर : गण्या, तुला हज्जारदा सांगितलं की हॉलीवुड चे पिक्चर  बघत जाऊ नको म्हणून!

गण्या : अहो मास्तर! काहीतरी स्टंट पाहिजे की नको नाटकात? ते काय फक्त पिक्चरवाल्यांनीच दाखवायचा काय?

मास्तर : मला हे थ्रिल, स्टंट आणि हानामारी अजिबात आवडत नाही!

गण्या : मग, महाभारतातली शेवटची रावणाची आणि अर्जुनाची लढाई कशी दाखवणार?

मास्तर : त्या दोघांना आपण बुद्धिबळ खेळायला लावू! म्हणजे कसं! काय मारामारी व्ह्यायची ती बुद्धिबळाच्या पटावर होईल. कुणाचच नुकसान नाही! काय?

गण्या : ओ मास्तर! त्या बुद्धिबळामुळेच् अख्खं रामायण घडलं!

मास्तर : हो का? मला कसं माहिती नाही?

गण्या : मी परत परत सांगतोय की तुमचा इतिहास.....

मास्तर ( जोरात ओरडत ) : गण्याsssss मी मघाशीच् सांगितलं ना की मला चिडवायचं नाही म्हणून?

गण्या ( नमतं घेत ) : बरं ! पुढे ऐकणार काय?

मास्तर : हा सांग लवकर !

गण्या ( परत पोज़ घेत ) : रावनाच्या विमानाचं crash लँडिंग करायचं!

मास्तर : ते कसं?

गण्या : थांबा. मी तुम्हाला करुनच दाखवतो!

मास्तर : अरे पण तुझ्याकडे विमान कुठे आहे?

गण्या : अहो मास्तर! practice करताना अश्या महागड्या गोष्टी वापरत नाहीत!

मास्तर : ठीक आहे! दाखव!

गण्या स्टेजच्या एका कोपऱ्यात जातो. दोन्ही हात विमानासारखे बाहेर काढतो. आणि गाडीला जशी किक मारून स्टार्ट करतात तसं त्याचं इमेजिनरी विमान चालू करतो. गण्याच्या तोंडातून बुलेट गाडी सारखा आवाज यायला लागतो

मास्तर : अरे गण्या! विमानाला बुलेट चा आवाज कसा काय?

गण्या : अरे हो! विसरलोच होतो की मी विमान चालवणार आहे ते! आम्ही शाळेत  दुपाराच्या सुट्टीत असंच गाड्या चालू करतो!

मास्तर : आणि विमानाला किक कशी काय बुवा?

गण्या : विमान फार्र् फार्र् वर्षांपूर्वीच्ं आहे ना! तेंव्हा आता सारखी टेक्नोलॉजी नव्हती!

मास्तर : असं होय!

गण्या पुन्हा विमानासारखी पोज़ घेतो आणि किक मारून विमानासारखा आवाज काढायला लागतो आणि स्टेजवर इकडे तिकडे पळायला लागतो.

मास्तर (त्याच्याकडे बघत ): हा आता घ्या उड्डाण!

गण्या आता उड्या मारत पळायला लागतो.

मास्तर ( न रहावुन ) : विमान कुणिकडं पोचलं?

गण्या : आत्ता सिंगापुरवर आहे.

मास्तर : सिंगापुर?

गण्या : हो. रावण मुद्दाम हिमालयाकडून आला होता.

मास्तर : का?

गण्या : त्याने विचार केला की कुणाला कळता कामा नये की तो श्रीलंकेतून आला होता ते!

मास्तर : अरे पण रावणाकडे लंका होती ना?

गण्या : नाही.  लंका ही सोन्याची होती आणि ती श्रीलंकेच्या शेजारीच होती. सोन्या म्हणजे आपल्या वर्गातील नाही. त्यावेळचा सोन्या वेगळा होता.

मास्तर : असं होय!

गण्या अजूनही उड्या मारत पळतोच आहे आणि अजून एक स्टेजला चक्कर मारुन

गण्या : मास्तर. इकडे लक्ष द्या. आता crash लँडिंग कसं होणार ते दाखवतो.

मास्तर थोड़े उत्सुक झाले. क्रिकेट मधील एखाद्या फील्डर सारखी पोज़ घेऊन स्टेजच्या एका टोकाला उभे राहिले.
गण्याच्या उड्या बंद होऊन पळायला लागला. स्टेजच्या मधे आल्यावर दोन्ही पायावर तीन चार उड्या मारल्या आणि क्रिकेट मधे जसा बॉल अडवण्यासाठी फील्डर आडवा होतो तसा गण्या आडवा झाला. अगदी मास्तरांच्या पायाजवळ साष्ठांग नमस्कारासारखा. गण्या थोड़ावेळ निपचिप पडतो.

गण्या (तसाच पडून ) : मास्तर, आता तरी आशीर्वाद द्या!

मास्तर गण्याच्या डोक्यावरून हात फिरवतात.

गण्या ( उठून उभा राहत आणि छाती बाहेर काढून ) : याला म्हणतात crash लँडिंग ऑफ़ विमान. कसा काय वाटला सीन?

मास्तरांना काय बोलावं कळत नाही, ते नुसतीच् मान डोलावतात. 

Wednesday, September 09, 2015

गण्या आणि मास्तर - भाग २ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या आणि मास्तर - भाग २ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या: मास्तर, तुम्ही चाणक्य होणार ना?

मास्तर: असं कोण म्हणालं?

गण्या चकित झाला आणि म्हणाला : आत्ता थोड्यावेळापूर्वी तुमचं भूत आलं होतं की काय?"

मास्तर (रागाने): गण्या, मी तुझा मास्तर आहे हे विसरु नको

गण्या : अहो मगाशी तर तुम्हीच कबूल केलत ना की तुम्ही चाणक्य होऊन तिघांना शिकवणार ते!

मास्तर: ते होय? बरं मग?

गण्या: मग असं समजा तुम्ही चाणक्य आणि मी अर्जून. मला आता तुम्ही म्हणाल्या प्रमाणे गणित शिकवा.

मास्तरांना काय बोलावं कळत नाही. फुल कंफ्यूज. (तोंडातल्या तोंडात पुटपुटतात): चाणक्य आणि अर्जून? त्यात गणित शिकवायचं?

गण्या: ओ मास्तर, तोंडातल्या तोंडात काय पुटपुटताय? 

मास्तर: गण्या, चाणक्य आणि अर्जून? असं इतिहासात कधी वाचलास?

गण्या: तुमचं इतिहास कच्च आहे हे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं!

मास्तर: अरे हो की!

गण्या: मग सुरु?

मास्तर: बरं ठीक आहे. बे चा पाढा म्हण.

गण्या: बे एके बे. बे दुणे पाच. 

मास्तर(जोरात  ओरडून): गण्या, मी असं शिकवलं होतं का?

गण्या: मास्तर, तुम्ही तो पिक्चर बघितला नाही?

मास्तर: कोणता?

गण्या: तो अभिषेक बच्चन आणि शम्मी कपुरचा?

मास्तर (डोकं खाजवत): अभिषेक बच्चन आणि शम्मी कपूर? असा कुठलाही पिक्चर आलेला नाही.

गण्या: काय तुम्ही पण? तो नाही का?

मास्तर (अजून गोंधळलेले): अरे पण कोणता? 

गण्या: तोच हो! दो और दो पाँच! त्यात ते गाणं पण आहे ते. हम वो है जो दो और दो पाँच बना दे। (असं म्हणत गण्या जोरजोरात  गाणं म्हणायला लागतो)

मास्तर (जोरात ओरडून): गण्या, ते पिक्चर मधलं नाही. आणि बावळटा, तूला कुणी सांगितलं त्या पिक्चर मधे अभिषेक बच्चन आणि शम्मी कपूर होते म्हणून?

गण्या: मी बघितला ना तो!

मास्तर: अरे त्यात अमिताभ बच्चन आणि शशि कपूर होते!

गण्या: त्यात काय फरक पडतोय! त्यांनीच तर सांगितलं की दोन आणि दोन पाच होतात म्हणून!

मास्तर (कपाळाला हात लावून): ते जाऊ दे! चौदाचा पाढा म्हण.

गण्या : काय हे मास्तर! दोन च्या पाढ्यावरन डायरेक्ट चौदा चा पाढा?

मास्तर: तुझ्यासारख्या अर्जुनाला चाणक्य म्हणून शिक्षक भेटलाय ना!

गण्या : ठीक आहे! चौदा एके चौदा, चौदा दुणे अट्ठाविस, चौदा त्रिकं बे चाळीस, (गण्या थांबतो)

मास्तर : अर्जुना, थांबलास का? चौदा चोक किती?

गण्या (नाना पाटेकरच्या आवाजात): अब तक छप्पन!

मास्तर (जोरात ओरडतात): गण्याSSSSS

गण्या: अहो मास्तर, ओरडताय कशाला? तुम्हाला माहिती नाही का की मुले म्हणजे देवा घरची फुले असतात ते!

मास्तर: तू आणि देवाघरचं फूल? हा बरोबर. तू नक्की धोतऱ्याचं फूल असणार!

गण्या: ओ मास्तर! माझं आडनाव बदलायचं काम नाही काय?

मास्तर: अरे? काय ही तुझी भाषा! मास्तरांशी असं बोलतात?

गण्या (कळवळून): अहो पण माझं आडनाव धोतरे नाही हो!

मास्तर (डोक्याला हात लावून): अरे, धोतऱ्याचं फूल कसं असतं ते माहिती नाही का? ते बघ, रानमळयात वाढतं ते?

गण्या: मला कसं माहिती! मी तुमच्यासारखं रानावनात हिंडत नाही! मी माणूस आहे! 

मास्तर: गण्या आता तू जास्ती बोलू नको हा! मला असा टोमना मारलेला आवडतं नाही. 

गण्या: बरं राहिलं! दगड मारू का? दगड?

मास्तर (परत जोरात ओरडून): गण्याSSSSS.

गण्या आणि मास्तर - भाग १ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या आणि मास्तर (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न) भाग १

मास्तर वर्गात रोड पेंटिंग आर्ट ची मुलांना चित्रे दाखवत असतात.

गण्या (मधेच उभा राहून): मास्तर, मास्तर, हे जुनं आहे! 

मास्तर (गण्याकडे थोडं दुर्लक्ष करत): मग परत बघ!

गण्या (खाली न बसताच) : 1857 साली अशा फरशा वापरायचे लोक. महाभारतात पण होतं. नविन काहीतरी दाखवत जा हो तुम्ही.

मास्तर (थोडं मिष्किल आवाजात): जाऊ दे गण्या! रागवु नकोस. तु महाभारतात बघितल्या आहेत या फरश्या, महाभारताच्या काळात तू होतास. बाकीचे नव्हते त्यांच्यासाठी दाखवतोय.

गण्याचा तोरा थोडा वाढला. मोठा कुणीतरी असल्यासारखा बोलू लागला: असं कसं म्हणता? सगळ्यांनीच रामानंद सागर यांचं महाभारत बघितले आहे! 

मास्तर : पण तु प्रत्यक्षातले बघितलेस ना! (आणि जोरात हसू लागतात) तु कोण होतास रे, शकुनि का? 

गण्या (आवाजात थोडा भारदस्तपणा आणून): रावण (आणि रावणासारखा हसायला सुरु करतो)

मास्तर (पूर्ण गोंधळलेल्या आवाजात): च्या मारी महाभारतात रावण कुठुण आला?

गण्या (आवाजात बदल न करता): रामायणातून (परत रावणासारखं हसत )

मास्तर अजून गोंधळलेलेच. हातवारे करत आणि हनुवटिवर एक हात आणि दुसऱ्या हाताची घडी घालत विचार करतायत.

गण्या: मला माहिती होतं तुमचा इतिहास कच्चा आहे ते! (मिष्किल पणे हसायला लागतो)

मास्तर (त्याच पोज़ मधे राहून): कारे तुला असं का वाटले?

गण्या : रावण रामायणातून महाभारतात कसा जाईल? 

मास्तर : तु असल्यावर काही भरवसा नाही देता येत, तु जाशील बाबा.

गण्या : अहो. तो विमानात बसून गेला ना! त्याच्याकडे विमान होतं बघा! ज्यातून त्याने द्रोपदीला पळवून नेल? 

मास्तर: धन्य झालो गण्या! तु आता अजुन किती पात्र दाखवणार आहेस कोणास ठाऊक! (आणि कपाळावर हात मारतात)

गण्या: तुम्हाला अजून दाखवायचं बाकी आहे! (आणि हसायला लागतो)

मास्तर (थोडं घाबरल्यासारखं करून): नको नको. मी इथेच बरा आहे.

गण्या: असं कसं असं कसं! तुम्हाला एखादा रोल दिलाच पाहिजे! (परत जोरात हसतोआणि म्हणतो) तुम्ही SS (थोडा विचार केल्यासारखं करून) तुम्ही ना! महाभारतातील जाम्बुवंत व्हा. खुश?

मास्तर: अरे जांबुवंताला केस होते मला टक्कल पडत चाललयं! आणि गण्याSS, महाभारतात जाम्बुवंत? (मास्तरांच्या चेहऱ्यावर मोठ्ठं प्रश्न चिन्ह).

गण्या : मास्तर मी मघाशीच् म्हणालो ना की तुमचं इतिहास कच्चा आहे म्हणून? 

मास्तरांना थोडं लाजल्यासारखं झालं. म्हणाले: पुन्हा मला असं चिडवायचं नाही काय. (मग परत आवाज ठीक करून) मी एक काम करतो मी चाणक्य होतो ठिक आहे?

गण्या (जागेवर उडी मारत): लई भारी! तुम्ही अशोकाला शिकवा. आणि शेंडीच्या ऐवजी धोतराची गाठ मारा!

मास्तर: एक नंबर. अरे पण माझी शेंडी शाबुत आहे!

गण्या (मास्तरांकडे दुर्लक्ष करत): धोतर फाटलं तरी गाठ सोडायची नाही!

मास्तर ( दोन्ही हाताने धोतर गुंडाळत): नाही नाही शेंडीच बरी

गण्या: पण शेंडी तर तुम्ही शाबूत ठेवली आहेस ना? वापरणार कशी?

मास्तर (अगदी मिष्किलपणे): गाठ मारुन (आणि हसायला सुरु करतात. गण्या सुद्धा हसन्यात सहभागी होतो).

गण्या : मग अशोकाला नको तुम्ही अर्जुनाला शिकवा.

मास्तर: चालेल ठरलं तर मग

गण्या: काय शिकवणार?

मास्तर: मी अर्जूनाला शिकवतो.

गण्या: अहो पण काय शिकवणार?

मास्तर: गणित शिकवीन ना. उगीच आर्यभट्टला राग नको यायला

गण्या: हा. बरोबर. मला माहिती आहे तो तुमचा आवडता विषय आहे ते. आणि घोड्यावर बसून क्रिकेट कसं खेळायचं ते कुणाला शिकवणार?

मास्तर: अर्जुन तेंडुलकरला.

गण्या: नाही. ते तुम्ही लक्ष्मणाला शिकवा. त्याचं काय आहे!त्याला क्रिकेट येतं पण घोड्यावर बसून खेळायला येत नाही अजून.

मास्तर (खुशीत येऊन): चालेल त्याला पण शिकवतो

गण्या: लई भारी. पण पगार तीन जणांना शिकल्याबद्दल जास्त मिळणार नाही, आत्ताच सांगतो. हां!

मास्तर: अरे! तु भी क्या याद रखेगा यार, चालेल!

गण्या: मास्तर, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे.

मास्तर (उत्साहात येऊन): काय रे! काय रे!

गण्या (अजून उत्साहात येऊन): आपण खरचं असं एक भन्नाट नाटक लिहूया! आणि शाळेच्या गैदरिंग ला उभं करायचं काय? काय म्हणता? 10 मिनिटांच नाटक आत्ताच तयार आहे. 

मास्तर : नक्की ! कधी बसायचं ते सांग फक्त. (जरा हाताचा अंगठा वर करतात आणि परत सावरत) म्हणजे नाटक लीहायला रे.

गण्या : रविवारी घेऊनच बसू? काय? 

मास्तर (थोडं ओरडल्यासारखं करून) : गण्याSS ! मास्तरांशी असं बोलतात का?

गण्या (जरा सावरत ): अहो म्हणजे, वही आणि पेन घेऊन हो!

मास्तर : हा ठीक आहे. मग नाटकाचं नाव ठेऊ वस्त्रहरण २

गण्या: नको. कॉपी केल्यासारखं वाटतंय! त्यापेक्षा नाटकाचं नाव ठेऊ...
(गण्याने हाताने बोर्डचा हवेत आकार करून जोरात म्हणाला).

वस्तारा हानीन

मास्तरांना काय बोलावं कळत नाही. ते फक्त गण्याच्या ऍक्शन कड़े बघत राहतात.

गण्या (त्याच पोज़ मधे राहून): बघणाऱ्यांच्या डोक्यावर शेवटी एक केस राहीला नसला पाहिजे. (आणि जोरात हसायला लागतो)

मास्तरांचा हात कपाळावरुन डोक्यावर थापट्या मारायला सुरु करतो.