Tuesday, September 22, 2015

गण्या आणि मास्तर - भाग ३ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या: मास्तर, एक आईडिया आलीय डोक्यात माझ्या!

मास्टर (जोरात हसून): आईडिया? आणि तुझ्या डोक्यात? अरे आईडिया डोक्यात यायला, डोक्यात मेंदू लागतो! (परत हसायला चालू करतात)

गण्या: ओ मास्तर! ऐकणार आहे की नाही! (गण्या फुगुन तोंड फिरवतो)

मास्तर (लाडात येऊन): गण्याsss! ए गण्याsss! अरे असा चिडू नको रे बाळा! माझ्या लाडक्या!

गण्या (अजून फुगुन): आम्ही नाही जा! तुम्ही सारखं माझी टिंगल करत असता!

मास्तर : अरे असं चिडायचं नाही! बरं सांग बघू पटकन काय आईडिया आहे तुझ्या मेंदूत?

गण्या (खुशीत येऊन) (मास्तरांच्या समोर अगदी ऐटित चालत जातो)
( दोन्ही पाय पसरून कमरेवर हात ठेवुन उभा राहतो).

मास्तर जरा घाबरून पाठीमागे सरकतात.

गण्या ( पाय तसेच ठेवत एखाद्या नामांकित फिल्म डायरेक्टर सारखा हाताची फ्रेम करून, एका डोळा मिटुन दुसऱ्या डोळ्यांनी त्या फ्रेम मधून इकडे तिकडे बघत ): एक भन्नाट आईडिया आहे!

मास्तर (थोडं सावरत आणि मख्खपणे त्याच्या action कडे बघत): काय?

गण्या ( स्वतःची पोज़ तशीच ठेवत) : तुमची एंट्री एकदम थ्रिल्लिंग झाली पाहिजे!

मास्तर ( फुल कंफ्यूज ): माझी एंट्री? आणि थ्रिल्लिंग? म्हणजे?

गण्या (कपाळावर हात मारत ): अहो मास्तर, तुम्ही रावण होणार ना?

मास्तर : ए गण्या! हे मी कधीही बोललेलो नाही हां. आता अजून एक रोल माझ्या गळ्यात घालायचा नाही!

गण्या : अहो मास्तर! असं काय करताय?

मास्तर (अगदी कानावर हात ठेवत आणि मान थोडी वर करून डोळे बंद करत) : नाही! जमणार नाही!

गण्या : मग राहिलं तर! मी करतो रावणाचा रोल!

मास्तर ( पुन्हा गण्याकडे बघत ) : मग पुढे काय?

गण्या ( परत पोज़ घेऊन ) : आपण इथे स्टेजवर विमानतळ तयार करायचं!

मास्तर : विमानतळ? ते कशाला? आणि एवढ्याशा जागेत ते कसं मावणार?

गण्या : अहो मास्तर, तुम्ही परत विसरलात.

मास्तर : काय?

गण्या : रावनाकडे विमान होतं की नाही?

मास्तर : होतं की! मग?

गण्या : ते कुठे आणि कसं उतरणार?

मास्तर (फुल कंफ्यूज)(डोकं खाजवत) : रावनाचं विमान उतरायला विमानतळ?

गण्या : मग? रावनाला तुम्ही असा तसा समजला की काय? रावण फार श्रीमंत होता! तुम्हाला माहिती नाही?

मास्तर : मला कसं माहिती? मी गणिताचा शिक्षक आहे, इतिहासाचा नाही!

गण्या : परत परत मी तुम्हाला आठवण करून देतोय की तुमचं इतिहास कच्च आहे ते!

मास्तर : हो रे! गण्या परत चिडवायचं नाही काय? नाहीतर मी नाटकात येणार नाही बघ!

गण्या (लाडात येत ) : अहो मास्तर. माफ करा मला! मी लहान आहे ना अजून?

मास्तर (थोडं ताठ मानेने): ठीक आहे गण्या! तू लहान आहेस म्हणून सोडून देतो!

गण्या : मग ऐका ना माझी आईडिया!

मास्तर : हा सांग पुढे!

गण्या (परत पोज़ घेत) : रावनाचं विमान उतरायला इथं स्टेज वर विमानतळ बांधायचं!

मास्तर : अरे! पण!

गण्या (ओरडून ): थांबा हो जरा! ऐका तरी पूर्ण!

मास्तर ( जरा घाबरत ) : बरं बरं ! सांग!

गण्या ( पुन्हा पोज़ मधे ) : रावनाच्या विमानाचं जबरदस्त crash लँडिंग झालं पाहिजे!

मास्तर : गण्या, तुला हज्जारदा सांगितलं की हॉलीवुड चे पिक्चर  बघत जाऊ नको म्हणून!

गण्या : अहो मास्तर! काहीतरी स्टंट पाहिजे की नको नाटकात? ते काय फक्त पिक्चरवाल्यांनीच दाखवायचा काय?

मास्तर : मला हे थ्रिल, स्टंट आणि हानामारी अजिबात आवडत नाही!

गण्या : मग, महाभारतातली शेवटची रावणाची आणि अर्जुनाची लढाई कशी दाखवणार?

मास्तर : त्या दोघांना आपण बुद्धिबळ खेळायला लावू! म्हणजे कसं! काय मारामारी व्ह्यायची ती बुद्धिबळाच्या पटावर होईल. कुणाचच नुकसान नाही! काय?

गण्या : ओ मास्तर! त्या बुद्धिबळामुळेच् अख्खं रामायण घडलं!

मास्तर : हो का? मला कसं माहिती नाही?

गण्या : मी परत परत सांगतोय की तुमचा इतिहास.....

मास्तर ( जोरात ओरडत ) : गण्याsssss मी मघाशीच् सांगितलं ना की मला चिडवायचं नाही म्हणून?

गण्या ( नमतं घेत ) : बरं ! पुढे ऐकणार काय?

मास्तर : हा सांग लवकर !

गण्या ( परत पोज़ घेत ) : रावनाच्या विमानाचं crash लँडिंग करायचं!

मास्तर : ते कसं?

गण्या : थांबा. मी तुम्हाला करुनच दाखवतो!

मास्तर : अरे पण तुझ्याकडे विमान कुठे आहे?

गण्या : अहो मास्तर! practice करताना अश्या महागड्या गोष्टी वापरत नाहीत!

मास्तर : ठीक आहे! दाखव!

गण्या स्टेजच्या एका कोपऱ्यात जातो. दोन्ही हात विमानासारखे बाहेर काढतो. आणि गाडीला जशी किक मारून स्टार्ट करतात तसं त्याचं इमेजिनरी विमान चालू करतो. गण्याच्या तोंडातून बुलेट गाडी सारखा आवाज यायला लागतो

मास्तर : अरे गण्या! विमानाला बुलेट चा आवाज कसा काय?

गण्या : अरे हो! विसरलोच होतो की मी विमान चालवणार आहे ते! आम्ही शाळेत  दुपाराच्या सुट्टीत असंच गाड्या चालू करतो!

मास्तर : आणि विमानाला किक कशी काय बुवा?

गण्या : विमान फार्र् फार्र् वर्षांपूर्वीच्ं आहे ना! तेंव्हा आता सारखी टेक्नोलॉजी नव्हती!

मास्तर : असं होय!

गण्या पुन्हा विमानासारखी पोज़ घेतो आणि किक मारून विमानासारखा आवाज काढायला लागतो आणि स्टेजवर इकडे तिकडे पळायला लागतो.

मास्तर (त्याच्याकडे बघत ): हा आता घ्या उड्डाण!

गण्या आता उड्या मारत पळायला लागतो.

मास्तर ( न रहावुन ) : विमान कुणिकडं पोचलं?

गण्या : आत्ता सिंगापुरवर आहे.

मास्तर : सिंगापुर?

गण्या : हो. रावण मुद्दाम हिमालयाकडून आला होता.

मास्तर : का?

गण्या : त्याने विचार केला की कुणाला कळता कामा नये की तो श्रीलंकेतून आला होता ते!

मास्तर : अरे पण रावणाकडे लंका होती ना?

गण्या : नाही.  लंका ही सोन्याची होती आणि ती श्रीलंकेच्या शेजारीच होती. सोन्या म्हणजे आपल्या वर्गातील नाही. त्यावेळचा सोन्या वेगळा होता.

मास्तर : असं होय!

गण्या अजूनही उड्या मारत पळतोच आहे आणि अजून एक स्टेजला चक्कर मारुन

गण्या : मास्तर. इकडे लक्ष द्या. आता crash लँडिंग कसं होणार ते दाखवतो.

मास्तर थोड़े उत्सुक झाले. क्रिकेट मधील एखाद्या फील्डर सारखी पोज़ घेऊन स्टेजच्या एका टोकाला उभे राहिले.
गण्याच्या उड्या बंद होऊन पळायला लागला. स्टेजच्या मधे आल्यावर दोन्ही पायावर तीन चार उड्या मारल्या आणि क्रिकेट मधे जसा बॉल अडवण्यासाठी फील्डर आडवा होतो तसा गण्या आडवा झाला. अगदी मास्तरांच्या पायाजवळ साष्ठांग नमस्कारासारखा. गण्या थोड़ावेळ निपचिप पडतो.

गण्या (तसाच पडून ) : मास्तर, आता तरी आशीर्वाद द्या!

मास्तर गण्याच्या डोक्यावरून हात फिरवतात.

गण्या ( उठून उभा राहत आणि छाती बाहेर काढून ) : याला म्हणतात crash लँडिंग ऑफ़ विमान. कसा काय वाटला सीन?

मास्तरांना काय बोलावं कळत नाही, ते नुसतीच् मान डोलावतात. 

Wednesday, September 09, 2015

गण्या आणि मास्तर - भाग २ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या आणि मास्तर - भाग २ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या: मास्तर, तुम्ही चाणक्य होणार ना?

मास्तर: असं कोण म्हणालं?

गण्या चकित झाला आणि म्हणाला : आत्ता थोड्यावेळापूर्वी तुमचं भूत आलं होतं की काय?"

मास्तर (रागाने): गण्या, मी तुझा मास्तर आहे हे विसरु नको

गण्या : अहो मगाशी तर तुम्हीच कबूल केलत ना की तुम्ही चाणक्य होऊन तिघांना शिकवणार ते!

मास्तर: ते होय? बरं मग?

गण्या: मग असं समजा तुम्ही चाणक्य आणि मी अर्जून. मला आता तुम्ही म्हणाल्या प्रमाणे गणित शिकवा.

मास्तरांना काय बोलावं कळत नाही. फुल कंफ्यूज. (तोंडातल्या तोंडात पुटपुटतात): चाणक्य आणि अर्जून? त्यात गणित शिकवायचं?

गण्या: ओ मास्तर, तोंडातल्या तोंडात काय पुटपुटताय? 

मास्तर: गण्या, चाणक्य आणि अर्जून? असं इतिहासात कधी वाचलास?

गण्या: तुमचं इतिहास कच्च आहे हे मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं!

मास्तर: अरे हो की!

गण्या: मग सुरु?

मास्तर: बरं ठीक आहे. बे चा पाढा म्हण.

गण्या: बे एके बे. बे दुणे पाच. 

मास्तर(जोरात  ओरडून): गण्या, मी असं शिकवलं होतं का?

गण्या: मास्तर, तुम्ही तो पिक्चर बघितला नाही?

मास्तर: कोणता?

गण्या: तो अभिषेक बच्चन आणि शम्मी कपुरचा?

मास्तर (डोकं खाजवत): अभिषेक बच्चन आणि शम्मी कपूर? असा कुठलाही पिक्चर आलेला नाही.

गण्या: काय तुम्ही पण? तो नाही का?

मास्तर (अजून गोंधळलेले): अरे पण कोणता? 

गण्या: तोच हो! दो और दो पाँच! त्यात ते गाणं पण आहे ते. हम वो है जो दो और दो पाँच बना दे। (असं म्हणत गण्या जोरजोरात  गाणं म्हणायला लागतो)

मास्तर (जोरात ओरडून): गण्या, ते पिक्चर मधलं नाही. आणि बावळटा, तूला कुणी सांगितलं त्या पिक्चर मधे अभिषेक बच्चन आणि शम्मी कपूर होते म्हणून?

गण्या: मी बघितला ना तो!

मास्तर: अरे त्यात अमिताभ बच्चन आणि शशि कपूर होते!

गण्या: त्यात काय फरक पडतोय! त्यांनीच तर सांगितलं की दोन आणि दोन पाच होतात म्हणून!

मास्तर (कपाळाला हात लावून): ते जाऊ दे! चौदाचा पाढा म्हण.

गण्या : काय हे मास्तर! दोन च्या पाढ्यावरन डायरेक्ट चौदा चा पाढा?

मास्तर: तुझ्यासारख्या अर्जुनाला चाणक्य म्हणून शिक्षक भेटलाय ना!

गण्या : ठीक आहे! चौदा एके चौदा, चौदा दुणे अट्ठाविस, चौदा त्रिकं बे चाळीस, (गण्या थांबतो)

मास्तर : अर्जुना, थांबलास का? चौदा चोक किती?

गण्या (नाना पाटेकरच्या आवाजात): अब तक छप्पन!

मास्तर (जोरात ओरडतात): गण्याSSSSS

गण्या: अहो मास्तर, ओरडताय कशाला? तुम्हाला माहिती नाही का की मुले म्हणजे देवा घरची फुले असतात ते!

मास्तर: तू आणि देवाघरचं फूल? हा बरोबर. तू नक्की धोतऱ्याचं फूल असणार!

गण्या: ओ मास्तर! माझं आडनाव बदलायचं काम नाही काय?

मास्तर: अरे? काय ही तुझी भाषा! मास्तरांशी असं बोलतात?

गण्या (कळवळून): अहो पण माझं आडनाव धोतरे नाही हो!

मास्तर (डोक्याला हात लावून): अरे, धोतऱ्याचं फूल कसं असतं ते माहिती नाही का? ते बघ, रानमळयात वाढतं ते?

गण्या: मला कसं माहिती! मी तुमच्यासारखं रानावनात हिंडत नाही! मी माणूस आहे! 

मास्तर: गण्या आता तू जास्ती बोलू नको हा! मला असा टोमना मारलेला आवडतं नाही. 

गण्या: बरं राहिलं! दगड मारू का? दगड?

मास्तर (परत जोरात ओरडून): गण्याSSSSS.

गण्या आणि मास्तर - भाग १ (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न)

गण्या आणि मास्तर (एक कॉमेडी नाटकाचा छोटा प्रयत्न) भाग १

मास्तर वर्गात रोड पेंटिंग आर्ट ची मुलांना चित्रे दाखवत असतात.

गण्या (मधेच उभा राहून): मास्तर, मास्तर, हे जुनं आहे! 

मास्तर (गण्याकडे थोडं दुर्लक्ष करत): मग परत बघ!

गण्या (खाली न बसताच) : 1857 साली अशा फरशा वापरायचे लोक. महाभारतात पण होतं. नविन काहीतरी दाखवत जा हो तुम्ही.

मास्तर (थोडं मिष्किल आवाजात): जाऊ दे गण्या! रागवु नकोस. तु महाभारतात बघितल्या आहेत या फरश्या, महाभारताच्या काळात तू होतास. बाकीचे नव्हते त्यांच्यासाठी दाखवतोय.

गण्याचा तोरा थोडा वाढला. मोठा कुणीतरी असल्यासारखा बोलू लागला: असं कसं म्हणता? सगळ्यांनीच रामानंद सागर यांचं महाभारत बघितले आहे! 

मास्तर : पण तु प्रत्यक्षातले बघितलेस ना! (आणि जोरात हसू लागतात) तु कोण होतास रे, शकुनि का? 

गण्या (आवाजात थोडा भारदस्तपणा आणून): रावण (आणि रावणासारखा हसायला सुरु करतो)

मास्तर (पूर्ण गोंधळलेल्या आवाजात): च्या मारी महाभारतात रावण कुठुण आला?

गण्या (आवाजात बदल न करता): रामायणातून (परत रावणासारखं हसत )

मास्तर अजून गोंधळलेलेच. हातवारे करत आणि हनुवटिवर एक हात आणि दुसऱ्या हाताची घडी घालत विचार करतायत.

गण्या: मला माहिती होतं तुमचा इतिहास कच्चा आहे ते! (मिष्किल पणे हसायला लागतो)

मास्तर (त्याच पोज़ मधे राहून): कारे तुला असं का वाटले?

गण्या : रावण रामायणातून महाभारतात कसा जाईल? 

मास्तर : तु असल्यावर काही भरवसा नाही देता येत, तु जाशील बाबा.

गण्या : अहो. तो विमानात बसून गेला ना! त्याच्याकडे विमान होतं बघा! ज्यातून त्याने द्रोपदीला पळवून नेल? 

मास्तर: धन्य झालो गण्या! तु आता अजुन किती पात्र दाखवणार आहेस कोणास ठाऊक! (आणि कपाळावर हात मारतात)

गण्या: तुम्हाला अजून दाखवायचं बाकी आहे! (आणि हसायला लागतो)

मास्तर (थोडं घाबरल्यासारखं करून): नको नको. मी इथेच बरा आहे.

गण्या: असं कसं असं कसं! तुम्हाला एखादा रोल दिलाच पाहिजे! (परत जोरात हसतोआणि म्हणतो) तुम्ही SS (थोडा विचार केल्यासारखं करून) तुम्ही ना! महाभारतातील जाम्बुवंत व्हा. खुश?

मास्तर: अरे जांबुवंताला केस होते मला टक्कल पडत चाललयं! आणि गण्याSS, महाभारतात जाम्बुवंत? (मास्तरांच्या चेहऱ्यावर मोठ्ठं प्रश्न चिन्ह).

गण्या : मास्तर मी मघाशीच् म्हणालो ना की तुमचं इतिहास कच्चा आहे म्हणून? 

मास्तरांना थोडं लाजल्यासारखं झालं. म्हणाले: पुन्हा मला असं चिडवायचं नाही काय. (मग परत आवाज ठीक करून) मी एक काम करतो मी चाणक्य होतो ठिक आहे?

गण्या (जागेवर उडी मारत): लई भारी! तुम्ही अशोकाला शिकवा. आणि शेंडीच्या ऐवजी धोतराची गाठ मारा!

मास्तर: एक नंबर. अरे पण माझी शेंडी शाबुत आहे!

गण्या (मास्तरांकडे दुर्लक्ष करत): धोतर फाटलं तरी गाठ सोडायची नाही!

मास्तर ( दोन्ही हाताने धोतर गुंडाळत): नाही नाही शेंडीच बरी

गण्या: पण शेंडी तर तुम्ही शाबूत ठेवली आहेस ना? वापरणार कशी?

मास्तर (अगदी मिष्किलपणे): गाठ मारुन (आणि हसायला सुरु करतात. गण्या सुद्धा हसन्यात सहभागी होतो).

गण्या : मग अशोकाला नको तुम्ही अर्जुनाला शिकवा.

मास्तर: चालेल ठरलं तर मग

गण्या: काय शिकवणार?

मास्तर: मी अर्जूनाला शिकवतो.

गण्या: अहो पण काय शिकवणार?

मास्तर: गणित शिकवीन ना. उगीच आर्यभट्टला राग नको यायला

गण्या: हा. बरोबर. मला माहिती आहे तो तुमचा आवडता विषय आहे ते. आणि घोड्यावर बसून क्रिकेट कसं खेळायचं ते कुणाला शिकवणार?

मास्तर: अर्जुन तेंडुलकरला.

गण्या: नाही. ते तुम्ही लक्ष्मणाला शिकवा. त्याचं काय आहे!त्याला क्रिकेट येतं पण घोड्यावर बसून खेळायला येत नाही अजून.

मास्तर (खुशीत येऊन): चालेल त्याला पण शिकवतो

गण्या: लई भारी. पण पगार तीन जणांना शिकल्याबद्दल जास्त मिळणार नाही, आत्ताच सांगतो. हां!

मास्तर: अरे! तु भी क्या याद रखेगा यार, चालेल!

गण्या: मास्तर, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे.

मास्तर (उत्साहात येऊन): काय रे! काय रे!

गण्या (अजून उत्साहात येऊन): आपण खरचं असं एक भन्नाट नाटक लिहूया! आणि शाळेच्या गैदरिंग ला उभं करायचं काय? काय म्हणता? 10 मिनिटांच नाटक आत्ताच तयार आहे. 

मास्तर : नक्की ! कधी बसायचं ते सांग फक्त. (जरा हाताचा अंगठा वर करतात आणि परत सावरत) म्हणजे नाटक लीहायला रे.

गण्या : रविवारी घेऊनच बसू? काय? 

मास्तर (थोडं ओरडल्यासारखं करून) : गण्याSS ! मास्तरांशी असं बोलतात का?

गण्या (जरा सावरत ): अहो म्हणजे, वही आणि पेन घेऊन हो!

मास्तर : हा ठीक आहे. मग नाटकाचं नाव ठेऊ वस्त्रहरण २

गण्या: नको. कॉपी केल्यासारखं वाटतंय! त्यापेक्षा नाटकाचं नाव ठेऊ...
(गण्याने हाताने बोर्डचा हवेत आकार करून जोरात म्हणाला).

वस्तारा हानीन

मास्तरांना काय बोलावं कळत नाही. ते फक्त गण्याच्या ऍक्शन कड़े बघत राहतात.

गण्या (त्याच पोज़ मधे राहून): बघणाऱ्यांच्या डोक्यावर शेवटी एक केस राहीला नसला पाहिजे. (आणि जोरात हसायला लागतो)

मास्तरांचा हात कपाळावरुन डोक्यावर थापट्या मारायला सुरु करतो.